संकल्प_निर्धार_बेत_निश्चय_इरादे_वगैरे

शिकवतो निर्धार माझा केवढे अध्यात्म हे
जे स्वतःपाशीच नाही ते म्हणाला द्यायचे 

© अनिल विद्याधर आठलेकर

पाहून रोजचे हे , अन्याय वंचितांवर
पक्का लढावयाचा , निर्धार होत आहे

©अमितकुमार वाणी 

ये कधीही; भेट घे बिनधास्त मित्रा
ठरवुनी जमणार कुठला बेत नाही

© अभिजीत काळे

फसला नाही असा कोणता बेतच नाही
म्हणल्या म्हणल्या तो कधी कुठे नेतच नाही

©अरु_तनया 

तो निश्चय ही कसला निश्चय ?
ज्याच्यामध्ये जर तर आहे

©भालचंद्र भुतकर 

आजन्म झुंजण्याचा निर्धार ठेवतो मी
माझ्या जुन्या यशावर नाही मदार माझी

©दत्तप्रसाद जोग 

ढासळू लागले सर्व निश्चय पुन्हा
आठवू लागली मोडताना शपथ
©डॉ.ज्ञानेश पाटील 

श्वासांत शेवटीही फुंकू नकोस वारा
उसणे नकोय जगणे निर्धार काल झाले
©धनंजय तांदळे

वरवर नुसत्या खमंग चर्चा रंगत होत्या
राजकारणी बेत आतुनी शिजत राहिले

©हेमलता पाटील

संकल्प पूर्ण नाही मागील कोणताही 
माझा नवीन वर्षी कुठलाच बेत नाही 

©जयश्री कुलकर्णी 

संकल्प मोडवेना अन् ध्यास सोसवेना
हल्ली मलाच माझा सहवास सोसवेना

© क्रांति साडेकर

लोणी मिळेल कैसे टाळूवरील याचा-
अंदाज बांधती ते आखून बेत येथे

©खलील मोमीन

आजही काही नवे केलेच नाही
मी विसरण्याचा तिला निर्धार केला

©किशोर मुगल

कोण जाणे जीवनाचा कोणता हा बेत आहे
कोण माझ्यातून मजला दूर कोठे नेत आहे

© लक्ष्मण उगले

जिवाला जेवढा आतून होतो त्रास एखादा
नवा संकल्प येतो चांगला जन्मास एखादा

©मनिषा नाईक 

माझा जगावयाचा साधाच बेत आहे
मरणाकडे परंतू आयुष्य नेत आहे.

© महेन महाजन

श्वास ह्या देहात तोवर तू मला हरवून दाखव
पाहुनी निर्धार माझा राग येतो वादळाला

© निलेश कवडे

एकहि निश्चय आपला नसतो सारखे कळते
निश्चय करून ही निश्चय ढळतो कितीदातरी

©नचिकेत ओझरकर 

आस ना उरली मनाला आज माझ्या
आज माझा खास काही बेत नाही.

©निशा डांगे 

मी रोज कैक वेळा हे ठरवले मनाशी
पण बेत सर्व माझे ते राहिले मनातच.

©प्रशांत रणसुरे.

काळीज फाटलेले साहून त्या यातना
निर्धार ठाम आता माझे मला तारणे

©प्रतिभा गुजराथी 

सोबती दोघेच आम्ही गारठाही खूप आहे
बेत तो बिलगायचा पण का तडीला नेत नाही

©राधिका फराटे 

ते पुन्हा आले हसू घेऊन ओठी
बेत त्यांचा आज खासम ख़ास आहे.

©रुपेश देशमुख 

तिचे सामान आहे बांधलेले
कळेना काय त्याचा बेत आहे

© #सुप्रिया_मिलिंद_जाधव

डोकावुनी मनाशी संकल्प जाय काही
गेल्यावरी असे हे, राहील कार्य काही ?

©प्रा.डॉ.संतोष कुलकर्णी, 

बेत ओला ठेव तेराव्यास माझ्या
फक्त डोळ्यांनीच का ओले रहावे

©सदानंद बेंद्रे 

उंच लाटांतला फक्त निर्धार बघ
राहिले रोखणारे किनारे किती

©श्रीपाद जोशी 

नको देऊस तू नुसते मला संदर्भ शब्दांचे
तुझ्या मौनातला निश्चय तुझ्या शब्दात आहे का

©शशिकांत कोळी 

हृदयाने निश्चय केला मेंदूने नाही म्हटले
अपमान कितीदा झाला माझाही माझ्यामध्ये

©शशिकांत कोळी 

दोन चाकांवर रथाचा भार असतो
सातही वचनातला संसार असतो 

रक्तं सांडे ,ओसरे ना घोर आशा
सैनिकाचा रांगडा निर्धार असतो

©सीमा गादे 

ऊन-वारा,पावसाला दावतो मी
'मोडला नाही कणा',निर्धार आता

© तु.सी.ढिकले 

घ्यावा निरोप मी अखेरचा निश्चय असा करतो
इतका विचार करुनही पुन्हा घरदार आठवतो

©उमेध

जेथे समर्पणाचा निर्धार होत नाही 
संसार मांडल्याने संसार होत नाही 

©विद्यानंद हाडके 

पर्वतासम हे तुझे संकल्प निश्चल
अन नदी मी वाहणारी बारमाही

©वैशाली शेंबेकर मोडक 

संकल्प सांगतो घ्या शेतीस लाख कोटी
हातात मात्र अंती गळकेच माप आहे

© विश्वास कुलकर्णी

मनाचा पाय पडला चुकीच्या पायरीवर
कणा मोडून बसला, उभा निर्धार सारा

©विजया टाळकुटे 

असे थेट डोळ्यात त्याचे मिसळणे
भला चांगला बेत माझा बिघडतो

© योगिता पाटील

इरादा चांगला होता तुला सोडून जाण्याचा
मला पर्यायही नाही असे तू सोड म्हटल्यावर

© यामिनी विलास


संकलक/संग्राहक : ©देवदत्त संगेप

Post a Comment

0 Comments