sad marathi shayari | sad shayari status | marathi sad quotes |


रात्रभर डोळ्यात वादळ राहिले

सांगण्यासाठीच काजळ राहिले..

© अल्पना देशमुख-नायक
==========================

आले वादळ गेले वादळ कसे न मिटले
आठवणींच्या वाळूवरचे ठसे न मिटले..

© अनंत नांदुरकर ‘खलिश’ 

==========================

स्मरणामधले वादळ येते तटबंदीसी
आयुष्याचा किल्ला धसतो तू नसताना..

©अजय पांडे

==========================

वादळे आली पुन्हा विझवावयास सारे
पाहिजे आता तुझा आधार विस्तवाला..
©अमित वाघ

==========================

श्वासांमध्ये वादळ देतो
स्पर्श तुझा इतके बळ देतो...

©आनंद रघुनाथ

==========================

मी पाचोळ्यागत धुळीसवे उडतो अन्
ती वादळ समजुन खिडक्या लावुन घेते...

©आनंद रघुनाथ
==========================

कोठेही चाहुल नाही कोठेही सळसळ नाही
हे भलते संकट दिसते हे नुसते वादळ नाही...

© अनिल विद्याधर आठलेकर
==========================

अहंपणाची लाट सुनामी येते...आणिक
हातामधला हात कितीदा नकळत सुटतो...

©अश्विनी आपटे
==========================

दोन इगोंच्या भेटीमधील वादळ म्हणजे नाते
प्राणपणाने चालवलेली चळवळ म्हणजे नाते..

©भूषण_कटककर.
==========================

होणार मुक्त आहे ही जन्मठेप आता
मौनात वेदनेच्या, गहिरे तुफान आहे...

© चंद्रशेखर भुयार
==========================

वादळे बाहेर तितकी आत माझ्या
ना मला सांभाळणे हातात माझ्या....

@दत्तप्रसाद जोग.
==========================

उरात असुनी वादळ माझा श्वास जाणवत नाही
तक्रार तुझी मी आयुष्या तरी नोंदवत नाही..

©धनंजय तांदळे
==========================

ह्रदयातल्या ह्रदयात मी सोसून घेता वादळे ,
साऱ्या जगाला वाटलो बदनाम झंजावात मी ..

© दास पाटील.
==========================

ती केवळ शब्दांनी वणवा कधी पेटवत नाही
तिला तिच्या मौनाचेसुद्धा वादळ करता येते...

© गोविंद नाईक

आयुष्याचे जेव्हा जेव्हा गलबत झाले
वादळ वारे तेव्हा तेव्हा सोबत आले...

©डॉ. गजानन मिटके

वादळे उठलीच होती कालच्या भेटीतही...
तीच होते मी..जरासा वेगळा होतास तू ...

© गाथा जाधव

ही तुझ्यापुरतीच रे ‘खावर’ जगाची वादळे
एकदा गेलास की थांबेल हे काहूरही . ....

©स्व.बदिउज्जमान खावर

आले चहु दिशांनी तुफान विस्मृतीचे
नाती जपून ठेवा अंधार फार झाला...

© हिमांशू कुळकर्णी

कसे थोपवू त्याला जे या मनात आहे ?
समोरचे हे वादळ सुद्धा भरात आहे...

©जनार्दन म्हात्रे

एक झंझावात तो वाटा विजेच्या चालला
वादळी एल्गार साध्या माणसांतुन संचरे…
©
क्रांति साडेकर.

चालुनी येता घरावर वादळे
धैर्य वाचाळी विरांचे मावळे...

©कलीम खान.

तू नको कोंडून ठेवू, हुंदक्यांची वादळे
एकदा हो मोकळी अन् शांत हा उन्माद कर...

© किशॊर मुगल

संपलाय कैलास पोचला म्हणाल सुद्धा आता
तिरडीवरती शांत भासतो उरात वादळ आहे......

© डॉ.कैलास सुमन सोमनाथ गायकवाड


कधी बाहेरुनी येते कधी आतून येते
कसे येणार हे वादळ कुठे सांगून येते...

©ममता सपकाळ

वादळ आहे म्हणून काही स्वप्न घराचे पडू नये का
कफल्लकाच्या जन्मामध्ये नवीन काही घडू नये का....

© मधुसूदन नानिवडेकर

अडवू नको किना-या तू वाट आज माझी
घेण्यास मी निघालो वादळ मिठीत आता...

©मसूद पटेल

लावली डोळ्यात मी आहे जरी समाधी
सुनामी सारखा मी रडू देखील शकतो...

@Maroti Manemod

कैक वादळे रोखुन धरली हृदयामध्ये
भिती वाटते एक सुनामी येइल बहुदा...

© मानसी चापेकर

प्राण घेऊन गेले वादळ
मागे उरली पडझड केवळ..

.©मनीषा नाईक Naik Manisha

© विश्वास कुलकर्णी

थांबले घोंघावते वादळ पुन्हा
ऐकली मग आतली सळसळ पुन्हा...

©निर्मिती कोलते

निरव शांतता आहे म्हणजे
निश्चित येईल वादळ मित्रा....

© नितीन भट

ध्येयास जिंकण्याची, उर्मी तुफान होती,
नव्हते करायचे जे, ते ही करून गेले...

©निर्मला सोनी.

कशी वादळे मौन झाली विचारू
कुठे पांगल्या त्या मशाली विचारू..

©निशांत पवार

श्वासांत मी कितीदा तुफान कैद केले
आता मलाच साधा वारा कुठे मिळेना.....

.©प्रफुल्ल कुलकर्णी

जिथे मी तिथे हे कुणी येत नाही
हवा लाट वादळ सुनामी बिनामी...

©प्रशांत वैद्य

एक झंझावात गेला बाग ही फुलवून माझी
वादळी होउन आता वाहतो मी सांजवारे….

©प्रशांत वैद्य

मी बेसावध असताना येऊन धडकले वादळ
अन समजावून थकल्यावर हलकेच सरकले वादळ
.
जर फसव्या होत्या हाका,हृदयात उमाळे नव्हते
कोणाच्या शब्दांवरती हे सांग थिरकले वादळ....

©राधा भावे

कशास भ्यावे उफानल्या मी वादळ वा-या
लांघत असतो संकटात ही तुफान लाटा...

© रमेश सरकाटे.

तुझी सुनामी क्षणाक्षणाला दिसायची पण
मनात माझ्या उधानलेपण कुठून आणू?..

© रुपेंद्र कदम 'रुपक'

मना सज्जना वरून दिसतो शांत जरी तू
तुझ्या किना-यावरती वादळ कुठून येते ?.

©रूपेश देशमुख

किनारा रोखतो आहे जरी वेल्हाळ लाटांना
सुनामी येत असते पण तुला जवळून बघताना..

©स्वाती शुक्ल

कळले नाही तेव्हा वाहत गेले कुठवर
वादळ येण्यापुर्वी ,साधा वारा होता ...

@स्वाती शुक्ल.

येता तुफान वारे गेली बुडून होडी
गुंत्यात गुंतलेली सुटली कधी न कोडी...

© डॉ. श्रीकृष्ण राऊत

भन्नाट हे जिणे पण बेतीव वादळांचे;
पेल्यातले जणू हे आहे तुफान वस्ती...

©श्रीकृष्ण राऊत

किती येऊ दे संकटांची सुनामी
कशाला दुःखाची करू मी गुलामी...

©शरद धनगर,

नौका शिडास म्हणते, सांभाळ तोल मित्रा
कोठूनही कधीही येते तुफान येथे...

.©शिव डोईजोडे

येतात वादळे अन् बेभान आठवेही
उद्विग्न मौन होते, आक्रोश धाय काही...

© प्रा.डॉ.संतोष कुलकर्णी

काळजाला घोर माझ्या लावते..
एक वादळ भोवती घोंगावते...

©संतोष वि.कांबळे

नित्यनेमाने उद्याही वादळे येतील येथे
काय धक्क्याने अशा ह्या उन्मळाव्या वृक्षवल्ली.

©सिद्धार्थ भगत

उभा ताठ मातीत तो आजही
जरी भोवती संकटे, वादळे...

©सचिन कुलकर्णी

भेटलो की वादळे होतात गोळा
हो ! तुझ्या माझ्यात झंझावात आहे

©सौभद्र

तू किती सांभाळ आता तावदाने
ते पहा वादळ दिशाहिन होत आहे..

©डॉ.सुनील अहिरराव

गाठायचा आहे किनारा शेवटी
भेटेल बघ तेथे खरे वादळ तुला..

©सुप्रिया मिलिंद जाधव

खुबीने बंद केलेली घराची तावदाने
मनाचे दार ठोठवले पुन्हा त्या वादळाने..

@सुप्रिया मिलिंद जाधव

वेड्यापिश्या झुंझारतेने रोखली मी वादळे
पेल्यात माझ्या दाटलेली झोकली मी वादळे…

©तुषार जोशी तुष्की

त्याला कवी व्हायचे होते, त्याने कागद सारे घेतले
माझी वादळे 'लिहितो' म्हणाला , मी थोडे वारे घेतले..

©तनवीर सिद्दिकी.

छप्पर होते तुझे तोवरी वादळ सोसत होतो,
आता साध्या फुंकरीपुढे निभाव नाही आई..

©वैभव_जोशी

प्रश्न असा नाही की वादळ काय ताकदीचे होते
प्रश्न असा आहे की त्याला नाउमेद केलेस किती.

.© वैभव वसंतराव कुलकर्णी

नुसती झुळूक येते डोळा
उरात वादळ उठतच नाही...

©विजय शिंदे

भेटते वादळ गुलाबी ते मला वरच्यावरी
मी कधीपासून ज्याला दूर आहे रोखले..

©वैशाली शेंबेकर मोडक

वादळे धुंदीत वाहू लागली
गजलमय झाले असे वातावरण..

©विशाल ब्रह्मानंद राजगुरु

सत्वपरीक्षा घेते आहे पुन्हा पुन्हा ती माझी म्हणजे
नियतीच्याही असेल नशीबी कणखरतेचे माझ्या वादळ

© विश्वास कुलकर्णी

वादळाला सवय झाली सोबतीने चालण्याची
ते मुली सोशीक आणि त्रास माझा फार नाही

©कामिनी केंभावी

अकस्मात जर वादळ उठले नसते,
चिमणा चिमणी कधी वेगळे नसते.

अविनाश येलकर

हळवा नकोस होवू तू बांध या मनाला
कित्येक वादळांना झेलायचे अजून रे

©अलका देशमुख

घर मला बांधायची आवड किती
वादळा करतोस तू पडझड किती

©अनिता बोडके

तुझी प्रीत की ती त्सुनामी वगैरे
ह्रदय त्यात झाले निकामी वगैरे

©हेमलता पाटील

अस्वस्थ होत शिरते जेव्हा मनात वादळ
ध्यानस्थ कोपऱ्याचा करतेच घात वादळ
.
अंधार मिट्ट रात्री वारा मिठीत घेतो
बेभान त्या स्मृतींचे येते भरात वादळ

©हेमलता पाटील

सोडला ना कधी वादळाने गळा
भेटला ना कधीही किनारा मला

©संजय गोरडे


संकलक/संग्राहक : ©देवदत्त संगेप

Post a Comment

0 Comments