कल्ला_कल्लोळ_कोलाहल_गलबला_गोंगाट


रस्ते फितूर झाले मज वाट सापडेना
कल्लोळ दाटला बघ रानात पाखरांचा...

©अल्पना देशमुख.

अंतरातला कोलाहल मी आत कोंडला
या माझ्या पण ओठावरचे हसे न मिटले…

©अनंत नांदुरकर खलिश.

एक होता सुकाळ स्वप्नांचा
एक भेटायची परी रात्री
.
फार कल्लोळ व्हायचा स्वप्नी
शांत झोपायचो जरी रात्री...

©आनंद रघुनाथ.

पायरीशी एवढा कल्लोळ कसला,
कोण गेले वेदना टाकून देवा ?..

©अनिल आठलेकर

खडा टाकला जाणिवेचा कुणी?
उरी चालला गलबला सारखा…

© अनिल आठलेकर

दुःखास जा म्हणू का दारात पोचल्यावर
का , स्वागतास जाऊ कल्लोळ शांतल्यावर….

©डॉ.अमिता गोसावी.

कल्लोळ कलीचा चहुकडे , वाटते पुन्हा ध्यानस्थ व्हावे .
नकोत हे फेरे चौरह्यांशीचे , शून्यात पुन्हा गर्भस्थ व्हावे...

©ॐनिल पाटील

निरव शांतता लाभो ऐसी हरपळ
नको आतला श्वासांचा कोलाहल …

©बाळ पाटील

देवा तुझ्यापुढे तो गोंगाट छान होता
मुर्ती लहान होती भोंगा महान होता…

©बळीराम पोधाडे

एक अजब कोलाहल आहे छान छान आवाजाचा
तो ज्यांच्या कानावर पडला त्यांचे तर डोळे फुटले

©चंद्रशेखर सानेकर.

क्षणीक गलबला, फसवे अश्रू, मरणाअंती
जीवंत असता नसतो 'दादा' नसते 'बाई' …

©चित्रा कहाते

मी तुझा गोंगाट दुनिये सोडतो आता जरा
आतल्या कोलाहलाला ऐकतो आता जरा….

©दत्तप्रसाद जोग.

एक वेड्याचा मनाशी खल पहातो ..
शांततेच्या आत कोलाहल पहातो ..

©दास पाटील

आत्मप्रौढीचा किती गोंगाट आहे ,
भेटते का शांतता मसणात पाहू...

©दास पाटील.

आतून कोरडा हा कल्लोळ जीवघेणा
डोळ्यामधील पाणी नंतर बघून घेवू...

© दिनेश मोडोकार.

सांगा कसे जगावे मी पोसतो जगाला
कल्लोळ फार केला पोटात आतड्यांनी…

©दिनेश मोडोकार.

उगा गोंगाट केला सावल्यांनी या,
खुशीने भेटलो होतो उन्हाला मी….

©गणेश नागवडे

जरी जन्मास माझ्या लावला तू नाट पायाने,
तुझ्या दारात ना केला तरी गोंगाट पायाने….

©गणेश नागवडे.

चालतो गोंगाट शब्दांचा असा की
कागदाचा मासळीबाजार होतो….

©गोविंद नाईक.

शांतता इतकीच त्या वर्गात होती
टाचणी पडली.. पुढे गोंगाट झाला...

© ग. वि. मिटके

वैताग बोलण्याचा येतो कधी कुणाच्या
कल्लोळ भावनांचा बघतात फक्त भिंती....

©गायत्री मुळ्ये.

सांगतो आहेस ते ऎकेन मी
बंद माझ्या आतला गोंगाट कर….

©जयदीप जोशी.

कोलाहल फक्त पहाते मी मूक-बधीरपणाने
पण हातभार कुठल्याही चर्चेला लावत नाही...

©क्रांति साडेकर.

भोवताली गल्बला होतो नको तो,
हासता मी केवढा उत्पात होतो…

©क्रांति साडेकर.

मेंदुतिल कोलाहल म्हणजे नेहमी गजबजलेला नाका
अन ही माझी तंद्री म्हणजे एकांताची खोली आहे….

©कैलास गांधी

रे ! सुखांनो,  थांबवा गोंगाट तुमचा
मी व्यथेला राहिलो झोक्यात निजवुन...

©किशोर मुगल

कल्लोळ वादळाचा होऊन लोळ येता;
घायाळ शब्द होतो व्याकूळ ओळ येथे....

©खलील मोमीन

गलका ..गर्दी..गोंधळ..गजबज. कोलाहल इतका की ..
हल्ली मी माझ्याशी काही काही बोलत नाही….

©ममता सपकाळ

केवढा गोंधळ इथे हा केवढा कल्ला
या करम मालिक म्हणू की या रहम अल्ला..

©ममता सपकाळ

टाळता आले कधी हे घोळके, गोंगाट हा
ये जरा गर्दीत दोघांचीच काढूया सहल.

©ममता सपकाळ

तू शांत झोप जा आता ओढून शांतता माझी
दे तुझ्या काळजामधला कोलाहल माझ्यासाठी

©ममता सपकाळ

आतल्या कोलाहलाची बातमी आहे कुठे?
मी मनाला मारल्याची बातमी आहे कुठे?

©मनोज दसुरी

पुजा अशी की देव बिचारा हतबल आहे
टाळ, आरती, भोंग्यांचा कोलाहल आहे

©मनोज दसुरी.

भावनांचा वेदनेचा थाट करतो
आत माझ्या हुंदका गोंगाट करते

©मारोती मानेमोड

बळी मीच जाते जगी शांततेच्या
मनी फार कल्लोळ उठतो अताशा

©माणिक घारपुरे

काय गलबला करता या शब्दांवर आता
शब्द बदलूनी अर्थ जरासे फिरवून घेऊ

©मेघा देशपांडे

संपता संपेचना कल्लोळ ह्या देहातला
ऐकला नाहीच मी आवाज कारण आतला

©मिलिंद छत्रे

गात्रात वासनेच्या कल्लोळ खूप झाला
बाहूत  मध्यरात्री एकांत घेतला मी....

©नितीन देशमुख.

केवढा नि:शब्द हा कल्लोळ आहे
की मला आवाज माझा येत नाही?.

© निर्मिती कोलते.

कल्लोळ फार अन् बोभाटा उरात माझ्या!!
दिसणार वेदनांचा, वाटा उरात माझ्या

©निलेश कवडे

राहतो चिंतेत जो, त्या माणसासाठी
शांतताही एक कोलाहल असू शकते...

©निलेश कवडे

एकांत आज माझा ,भिंतीत चार होता !
गोंगाट आज नव्हता ,तुझिया घरा प्रमाणे…

©पुरुषोत्तम वराडे

दारात सज्जनांच्या येतोय गलबला पण
अद्याप लांब अजुनी त्यांचे वऱ्हाड येथे…

©पुरुषोत्तम वराडे

तुला बिलगून आल्यावर उराशी गलबला होतो
जरा काळीज सावरते जिवाचे रान केल्यावर...

©प्रशांत मडपूवार.

प्राण्यांचे कोलाहल होते
माझ्यात एक जंगल होते…

©राहुल गडेकर

एकटी झाले पुन्हा मी या क्षणालाही
आतला गोंगाट काही सोसवत नाही….

©राधिका फराटे

गोंगाट वाढलेला आहे सभोवताली ;
हाकारण्या तुला मी आवाज उंच केला….

©श्रीकृष्ण राऊत.

नजरेत वासनेचा जळता विखार लपला,
नवरात्र पुजुन करती गोंगाट आरत्यांचा...

© स्वामीजी निश्चलानंद.

फोटो अपुला जुना पाहिला अन् उठला कल्लोळ जुना
इमारतीच्या जागी होता... तो आठवला बोळ जुना

©शुभानन चिंचकर

माहिती नाही कशाने पेटलो होतो इरेला
आतला कल्लोळ इतका पोचला होता टिपेला...

©शुभानन चिंचकर

कल्लोळ केवढा, न कुणालाच पायपोस
अपुलेच बडवतात किती वाद्य गझलकार..

©शुभानन चिंचकर

कोलाहल पुरता अजून माझ्या मनात भिनला नाही
हे टोक कुण्या अस्पर्श सुराचे अजून खुपते आहे....

©सदानंद बेंद्रे.

खायला उठल्यावरी ही शांतता मी ठरवले-
एक कोलाहल पुन्हा चघळायला आपण हवा

©सुशांत खुरसाले

हुंदके आले तरी गोंगाट नाही
या उदासीचा कुठे बोभाट नाही..

©सतीश दराडे

जाणिवांची पोकळी अंधार खाली
सारखा कल्लोळ असतो भोवताली…

©श्रीपाद जोशी.

शांततेचा केवढा गोंगाट होतो
राहिलेले बोलणे बोलून घेऊ

©श्रीपाद जोशी.

एक अजब कोलाहल शहराच्या खुंटीवर..
काळाचा अनुवाद करत होते सानेकर..

©शिल्पा देशपांडे

घेऊन रात्र आली कल्लोळ आठवांचे
लागे सख्या जिव्हारी आकाश चांदण्यांचे..

©सुनीति लिमये.

गर्दीस भूलवुनी गेले,जे कालचे कोलाहल
त्यांचेच बोट धरूनी,काळोख काटले मी..

©सीमा गादे

स्वर्गीय गायनाने कोकीळ ज्ञात होता
गोंगाट माणसांचा हा वाद्यवृंद आता ..

©सीमा गादे

नीरवतेला कंठ फूटती,कोलाहल जरी दाबलेले...!
सोसतांना लागे कस हा ,दळदार ह्रदय भांबावले..

©सीमा गादे

हळू बोल आता किती रात्र झाली
तुझे श्वास गोंगाट करतात कानी....

© स्वाती शुक्ल.

बंद ठेवली होती खिडकी कोलाहल थांबवतांना
बरेच पक्षी बसून होते जागेवरती अजूनही.

©सानिका दशसहस्त्र

उथळ असताना तिने गोंगाट केला
गाठली खोली नदीने, शांत झाली…

©सुप्रिया मिलिंद जाधव.

फक्त विरोधी सूर, जणू कोलाहल सारा
कोण कुणाचे आर्जव येथे ऐकत आहे ?.

 © प्रा.डॉ.संतोष कुलकर्णी.

अंतरीचा मांडण्या कल्लोळ मी...
बुडवतो रक्तात माझी ओळ मी..

©संदीप वाकोडे

आत माझ्या चाललेला खल मनाचा...
होत नाही शांत कोलाहल मनाचा...

©संदीप वाकोडे

व्यस्त मोबाईलमध्ये लेकरे झाल्यामुळे
राहिला गोंगाट ना चौकात पूर्वीसारखा

©संतोष शेळके.

नको ह्या सांजवेळेला उन्हांचा गलबला आता
दिवस फासावरी गेला,कशाचा फैसला आता?.

©वैभव जोशी.

पाहिजे गोंगाट अन् गर्दी मला
भेटते तेव्हा कुठे शांती मला…

©वैभव देशमुख.

केवढा कल्लोळ होता आत अन बाहेरही
कागदावर मांडता मी .. ते म्हणाले लेखिका

©वैशाली शेंबेकर मोडक

शब्दांसवे कधीही हमखास भांडतो मी
कल्लोळ अंतरीचा काव्यात मांडतो मी

©विनोद मोरांडे

कोलाहल किती बघा रोज वाढतो आहे,
आता वाजवू कुठे मी सतार आयुष्या..

©विजय चांदेकर

कोण आहे आत माझ्या बोलतो मी अन कुणाशी
गलबला हा चहुकडे पण शांतता माझ्या तळाशी

©वसंत शिंदे.

जीवघेणा हा कशाचा गल्बला ?
ओळखीचे वाटते आहे शहर…

©वर्षा बेंडीगेरी कुलकर्णी.

निशब्द या दुपारी कोलाहल आठवांचा
अस्पष्टसा रव आणि आभास पावलांचा…

©योगिता पाटील.

संकलन- देवदत्त सांगेप

Post a Comment

0 Comments