marathi shayari on life| marathi life status |


पहाटे पहाटे कसे हात सोडू हवा सारखी ही, मिठी मागते
मने चूर स्वप्नात असतात इतकी उन्हावर गुलाबी धुके दाटते

© अनिल विद्याधर आठलेकर

किती वेडी मनाची मृगजळी ही लालसा आहे
धुक्याच्या गर्दगाभाऱ्यात चहरा छानसा आहे

©अनंत नांदुरकर खलीश

कधी पावसाच्या सरी सारखा तू
कधी दाटतो अंतरी सारखा तू

हळूवार तुजला लपेटून घ्यावे
धुक्याच्या कधी चादरी सारखा तू

©अनिता बोकडे

(जगू देत नाही, मरू देत नाही )
धुके चांदणे अंथरू देत नाही

असे वेड केव्हा कमी होत असते?
तिची धुंद ती ओसरू देत नाही

© अल्पना देशमुख-नायक

नको जाणिवांवर धुके संशयाचे
नको चांदण्यांना बिलगणे उन्हाचे

©डॉ.अमिता गोसावी

वाटला होता जरासा वेगळा तो भेटल्यावर
सोडुनी गेला तरीही स्वार्थ त्याचा साधल्यावर

दाटले आहे मनावर गैरसमजाचे धुके बघ
ते कसे निवळेल मित्रा भेटणे तू टाळल्यावर

©अश्विनी आपटे

अडाखे बांधले होते मनाशी मी खरे झाले
धुके जेव्हा निवळले स्पष्ट सारे चेहरे झाले

©आबिद मुनशी

बंद खोलीत आसवे काही
काजव्यांचे जणू थवे काही
.
भेट नव्हतीच ती, धुके होते
भेटले फक्त गारवे काही... ©

चित्तरंजन_भट

अजून तर मी हवा चाचपत पुढे पुढे सरकत होतो
मला दरीच्या पलीकडे हे घेउन गेले धुके कधी?

© चंद्रशेखर सानेकर


ठेवुनी दव तुझ्यावर धुके पांगले
विभ्रमाच्या पुढे आढळावी उन्हें...

©दास_पाटील

दृष्टीवरी कुणाच्या इतके धुके नसावे
पाण्यामधून सुद्धा मृगजळ दिसेल नंतर...

© दास पाटील


त्या मंतरलेल्या वाटा दाट धुके वळणावर
वाटेत पुन्हा तू मखमल अंथरताना दिसते...

©धनंजय तांदळे

सकाळी नदीचे मुके घाट होते
तुझ्या आठवांचे धुके दाट होते

हवा ओलसर अन् मळभ आठवांचे
व्यथेची निसरडी पुन्हा वाट होते

©हेमलता पाटील

भेटली ती अन सुचवले विषय गजलांचे
बोलली मोघम बरसले विषय गजलांचे

ती म्हणाली, ओसरू दे हे धुके थोडे
त्या धुक्यातच मी गिरवले विषय गजलांचे

©जनार्दन केशव

मनाच्या तळाशी धुके दाट आहे
कळेना कसे मी स्वतःला पहावे …

©जयश्री कुलकर्णी

धुके जर गैरसमजाचे उद्या आलेच नात्यावर
भरवश्याची उन्हे शिंपड पुन्हा तितक्याच प्रेमाने

©जयश्री कुलकर्णी

तुझ्या वाटेत आहे का धुके घनदाट आयुष्या
कधीची पाहतो आहे तुझी मी वाट आयुष्या

©जयदीप विघ्ने

मनाला अता मी कसे आवरावे ?
तुझ्या आठवांचे धुके दाट व्हावे

©कविता डवरे लाहुडकर

नववर्षाची पहाट झाली स्वागत आहे
नवीन स्वप्ने दारी आली स्वागत आहे

निळे-सावळे डोंगर धुक्यात हरवून गेले
हिरवी पाती दवात न्हाली स्वागत आहे

©किशोर बळी

धुके मलमली अंगावरती लेउन घ्यावे
असे वाटते सुर्यानेही उशिरा यावे

पहाट वेळी मनास वाटे पानोपानी
दवबिंदूंनी मंद सुगंधी अत्तर व्हावे..

© मानसी चापेकर

धुक्याच्या हवेचा शहारा निराळा
झुल्यावर नशेच्या बिलगली सकाळी

©बेहेरे मकरंद


कशाने धुके सांग गंधाळले?
कुणी अत्तराचे दिवे जाळले?

कुणी बांधले चाळ पायी ऋतूंच्या
निळेगर्द आभाळ वेल्हाळले...

© नितीन भट

विरली धुक्यात स्वप्ने सारीच पाहिलेली
रेखाटले नव्याने मी विश्व कल्पनांचे..

©निशा डांगे

पुन्हा थांबता पापण्या सर्द झाल्या
धुके माळताना कळ्या गर्भ झाल्या

©प्रभा प्रभुदेसाई

पहाटे धुक्याच्या लपेटून शाली
मिठी धुंद आणीक उबदार व्हावी

जरी स्वप्न वाटे तरी सत्य व्हावे
तुझी भेट ऐसी धुवांधार व्हावी

©प्राजक्ता गोखले पटवर्धन

धुके गोठलेले सुन्या पापण्यांवर
किती मी उन्हाची प्रतीक्षा करावी ?

©रुपेश देशमुख

फुलांचे सडे फार प्राचीन झाले
तुझ्या स्वागताला धुके अंथरावे..

©राधिका_फराटे

लपेटून घ्यावे तुला भोवताली धुके यौवनाचे पुन्हा दाट झाले
पुन्हा दोन ओळी गुलाबी निघाल्या पुन्हा शेर भलतेच सैराट झाले

©राधिका फराटे

धुक्यात स्वप्न जाळले कुणीतरी कुठेतरी
किती निवांत झोपले कुणीतरी कुठेतरी

©रत्नमाला शिंदे

स्वतःच्या सोबतीने बिनचुके घेऊन फिरतो
भ्रमाचे केवढे भवती धुके घेऊन फिरतो

©राहुल गडेकर

पहाट वारा, काळजास या छळतो आहे
आठवणींचे, धुके घेवून फिरतो आहे

©राम गायकवाड

दवबिंदूने कळी उमलली पुन्हा एकदा
तिची आठवण भल्या पहाटे बहरत होती

आठवणींचे धुके पसरले भल्या पहाटे
तिथे फुलांना प्रभात वेडी वेचत होती.

©डॉ.राज रणधीर

पहाटेला धुके स्वप्नात आले
दवाचा थेंब होता पापणीवर

©सुप्रिया_मिलिंद_जाधव


हा गुलाबी गारवा अन मोगरा गंधाळलेला
धुंद गाणी संगतीला अन चहा वाफाळलेला

धुंद ओलेती हवा, नयनी धुके वेडावणारे
मी तुझा जाणीवपूर्वक स्पर्श होता टाळलेला

©शुभानन चिंचकर 'अरुण'

तुझ्यासारखे कोण दिसले पहाटे
धुके नेसलेला निखारा असावा

©सदानंद बेंद्रे

हवेचा व्हायचा ओटा धुक्याच्या व्हायच्या भिंती
मनाजोगे रहाया घर कधी होते कधी नव्हते...

©सतीश दराडे

शक्य नाही या घडीला हे धुके ओलांडणे
भेटूया आता दरीने ऊन पांघरल्यावरी

©सुधीर_मुळीक

स्वीकारून झाले तुझे दूर जाणे
धुके ऐकते हे उदासीन गाणे ..

©सीमा गादे

उतरत्या सांजवेळेला धुके मागायचे नव्हते
असे लाचार नियतीने...मला बनवायचे नव्हते

©डॉ.स्नेहल कुलकर्णी

बघ ना कधी मनाची तू प्रीत एकदा
वाटेल गात जावे हे गीत एकदा

सजली धुक्यात येथे रमणीय ही प्रभा
ये साजणा मनाच्या मर्जीत एकदा...

©शीतल कर्णेवार

लांबचे का? जवळचेही दूर गेले
गैरसमजांचे धुके घनदाट झाले..

© सुचेता शिंदे

तू धुक्यासारखी,मी उन्हासारखा
डाव नाहीच हा मांडण्यासारखा..

©वैभव जोशी

एक हिवाळा हुडहुडणारा थरथरणारे गाणे
हात घेऊनी हातामध्ये धुक्यात हरवून जाणे...

©वैभव देशमुख

धुक्यात अडकू नकोस, दिसले जरी तुला ते सुंदर
वाट लागते अशी त्यात की वाट सापडत नाही

©विशाल राजगुरू


धुक्यात सावळ्या बुडून स्वैर लाट चालली
तरंग सावरून घे अधीरता जळातली
©वर्षा बेंडीगेरी कुलकर्णी


गेला निघून तोही, चकव्यापरी जरासा
काळ्या धुक्यात गहिऱ्या, ढूंडाळते मनाला

©वैश मिर्झापुरे

संकलक/संग्राहक : ©देवदत्त संगेप 

Post a Comment

0 Comments