Sad marathi shayari on shetkari | shetkari marathi status | shetkari marathi quotes |

गार पडले हात माझे काढला मी सातबारा

आज डोळे उघडले अन वाचला मी सातबारा

राज्य आले पक्ष आले राज कारण वेगळाले
आजही नाहीच कोरा जाळला मी सातबारा....

©अलका देशमुख 

कुठे अताशा मलाच मिळतो मिठीत माझ्या थारा ?
तिच्याच नावे होत चालला कुशीचा सातबारा...

©आनंद पेंढारकर 

केला कधी न कोरा, शेतीत सातबारा
भरघोस द्या तयांना, होईल सरबराई...

© अनिल जाधव 

मी कुठे आलो इथे वस्ती कराया 
मी कधी मागीतला का 'सातबारा'  ?

 ©अरविंद पोहरकर 

मी तुला देईन माझा सातबारा, मालकी
तू तुझी पहिली उधारी संपवाया पाहिजे..

 ©आनंद माने.

सातबारा पूर्ण माझा कर म्हणे कोरा
प्रश्न तारांकित किती हे मांडणे झाले...

© भागवत देवकर‎ 

ज्यांच्याकडे तलाठी त्यांना मदत मिळाली 
ज्यांचा न सातबारा , त्यांना कुणी न वाली...

©चंद्रशेखर भुयार

तुझे मानते शेत मजला धनी..
मला कागदी सात बारा नको...

©दत्तप्रसाद जोग. 

नुसताच सातबारा घनदाट भावकीचा ,
बांधावरीच बसतो नात्यास फास माझा...

© दास पाटील.

वाहणे शेती बळीला परवडेना
वाहतो हा कर्ज बोजा सातबारा..

© डॉ. देवराव चामनर 

गेली जमीन थोडी लग्नात लेकराच्या 
झाला अजून थोडा अस्वस्थ सातबारा...

© गोविंद नाईक

काल सुखरूप झाली वाटणी वावराची,
चार चिमण्या,पिलांनी फाडला सातबारा...

©गोपाल मापारी 

मिळत नाही नांगराया विकाया सुद्धा
जीवनाचा कागदी सातबारा उरला..

©दत्त प्रसाद जोग 

पाहून घे महात्म्या, इथली शिवार राने
केला भकास भारत, शोषून इंडियाने
.
संपूर्ण सातबारा, कोरा करू म्हणाले
भुललेत भाड़खाऊ, दिल्लीत पोचल्याने...

©गंगाधर मुटे 'अभय'

जाळून आज आलो माझाच सातबारा
आता मला नसावी चिंता उभ्या पिकाची...

© ग.व.माद्यसवार 

जोखुनी घे सातबारा, मग मला होकार दे तू
जिंदगी अवघी बळीची नोंदली खात्यात आहे…

© सौ.हेमलता पाटील

योजनांचे पीक विकती राज्यकर्ते येथले हे
सातबारा रोज का पिकतो महाराष्ट्रा तुझा रे ?
.
एकदा कोरा करुन घे सातबारा हा तुझा तू
नाद सह्याद्रीत दुमदुमतो महाराष्ट्रा तुझा रे...

©जनार्दनकेशव 

ना तिला घर दार वा ना कोणताही सातबारा
काढला आहे कुणी का माळरानाचा उतारा ?...

© ज्योत्स्ना चांदगुडे 

या मनाच्या कोपऱ्याशी झुंजणारा
कोंडमारा,कोंडमारा,कोंडमारा
.
जन्मभर वाहून ओझे शांत झाला
सातबारा,सातबारा,सातबारा..

©कालिदास चवडेकर 

अंतरी या घाव झाला काय सांगू
कारणी तू हे कुणाला काय सांगू
.
आज कोरा सातबारा हा कराया
लावले मी जे पणाला काय सांगू..

©काश्मीरा पाटील

स्वप्न हिरवे पुन्हा तू नको रंगवू
शासनाला तुझा सात बारा हवा..

©क्षितिजा आरती  

नको वाटल्या त्या सरी श्रावणाच्या
कोरड्या मनाचा कोरा सातबारा..

©मधुराणी बनसोड 

भाव हा खाऊन गेला पावसाळा 
सांग मी कोठून आणू सातबारा...

©निर्मला सोनी.

मला जन्म देवा दुबारा नको
जिवाला उगी येरझारा नको
.
नवा दे मला सातबारा असा
तुझा जीवना बोजवारा नको..

©प्रकाश मोरे 

गझलेतल्या जमीनी,नसती गहाण कोठे
हा एक सातबारा,कोणाकडेच नसतो...

©प्रमोद राठोड 

फायलींचा संपला नाही ढिगारा
कागदोपत्रात मेला देश सारा
.
कर्जमाफी द्यायचे नाटक कितीदा
एकदा मोजा स्वतःचा सातबारा...

©पवन नालट 

वेदनेचा सातबारा ना कधी झालाच कोरा
रोग होता जागतिक अन गावठी उपचार झाले...

©प्रवीण तुरानकर 

आनंद शोधतांना हातात दुःख आले
को-याच जीवनाचा कोराच सातबारा ...

©राम गायकवाड

खूप झाला मानभावी पोटमारा
जिंदगीचा हाय कोरा सातबारा.

© रविन्द्र जवादे. 

तळिराम होत जातो... जेव्हा सुधाकराचा 
गिळतो कुणी कुणाचा...पेल्यात सातबारा…

©रोशनकुमार पिलेवान 

उभा जन्म मी वंचिताच्या शिवारी
विठू तू कुठे सांग आहे फरारी 
.
कधी व्हायचा सातबारा रिकामा
कुठे लाच खाऊ तुझा तो पुढारी ...

©रवी धारणे.

या नभाचा सातबारा तू मला सांगू नको
कोण होता ध्रूवतारा तू मला सांगू नको...

© सुधीर सुरेश मुळीक

काल एकदा गहाण पडला पुन्हा सातबारा
त्यामुळेच तर घरात आली आमच्या दिवाळी...

©संतोष शेळके 

तो न नुसता वावराचा सातबारा
आमच्या तो यातनांचा गोषवारा.. 

©संदीप वाकोडे.

कर्जात शेत गेले, गेला तसा निवारा 
येतोय रोज त्याच्या डोळ्यात सातबारा...

© ॲड. शिवाजी खाडे 

भुकेने पुन्हा घेतला फ़ास आहे
रिकामा असावा तिचा सातबारा...

©संतोष वाटपाडे 

कर्जमुक्ती काय देता थोड़ बळ दया नांगराला 
सातबारा सावकाराच्या घरी धुळ खात आहे...

©सुगत मानकर

काळ सर्वांची अगोदर चाचणी करतो
मग कुणाला काय द्यावे आखणी करतो
.
भावकीचा लागला जर रोग मातीला
सातबारा भाकरीची वाटणी करतो...

©सुरेश इंगळे 

कशाला सातबारा द्यायचा माझ्या व्यथेचा मी?
खुशीने मीच माझ्या वेदनेला पाळतो आहे....

©विशाल ब्रह्मानंद राजगुरु 

जेव्हा हिशेब माझा मागेल जन्म सारा
हे काव्य पामराचे इतकाच सात बारा...

©विनायक पाटील

हंगाम कोरडा पण कंबर कसून जगतो...
माझ्याच हिंमतीवर शेती करून जगतो...

रमेश बुरबुरे 

धरती तना-मनांची भेगाळली अनंता
यंदा तुझ्या कृपेचा मोसम जहाल होता...

©रुपेश देशमुख. 


Post a Comment

0 Comments