love shayari in marathi| love marathi status | love marathi quotes |


उन्हाळा कळेना, हिवाळा कळेना
तिच्या संग मज पावसाळा कळेना....

©अरविंद पोहरकर.

किती पावसाळे, हिवाळे किती
तरी माणसाला उन्हाची भिती...

©आनंद माने.

स्वप्नात रोज रात्री असतो सुखद हिवाळा
सत्यात जीवनाची भरते उन्हात शाळा...

©अमिता गोसावी

एवढे आता करू दे
हात हाती हा धरू दे

केवढी थंडी गुलाबी
या मिठीला पांघरू दे...

©अनिता बोडके.

उत्तरे सापडायची पूर्वी
माणसे उलगडायची पूर्वी
.
जात होत्या मिठीमधे रात्री
काय थंडी पडायची पूर्वी...

©भूषण कटककर.

शब्दात भावनेला विणतो 'शऊर' जेव्हा
गजलेमधे गुलाबी दुलई तयार होते

©शऊर खेडवाला चैतन्य कुलकर्णी 'शऊर'

खूप नक्षीदार आहे शाल पण
एकमेकांनाच आता पांघरू
.
आपल्या दोघांमधे कोणी नको
ये मिठी नेसू, तिची वस्त्रे करू...

©चित्तरंजन भट.

जगणे कठीण झाले, मरणे कठीण झाले
शोधात सावलीच्या, पळणे कठीण झाले
.
हंगाम अन ऋतूही विसरून स्वत्व गेले
हा ग्रीष्म की हिवाळा, कळणे कठीण झाले....

©गंगाधर मुटे.

का हिवाळा येत नाही, ऊन आहे
हा जिवाला जाळतो मान्सून आहे..

. ©डॉ. #गिरीश_खारकर

तशीच आहे शाल कपाटामध्ये
ती गेल्यावर थंडी पडली नाही...

©गोविंद नाईक

गारवा, शेज अन रातराणी, मिठी
आणखी काय सांगायला पाहिजे...

©गोविंद नाईक.

जवळ येण्याचे किती सांगू बहाणे
बटण, थंडी, चांदणे अन झुरळ सुद्धा..

©गोविंद नाईक.

घे व्यथे स्वीकार माझ्या आसवांची शाल हळवी
मी कधी केला कुणाचा कोरडा सत्कार नाही ..

© गोविंद नाईक.

हरवली ज्या क्षणाला शाल आईची
मनाला खूप थंडी वाजली होती...

©गणेश नागवडे.

झुळुक थंड येता मला खेटते ती
जरा गारव्याला...हिवाळा कशाला?..

©हेमलता पाटील

हवे फक्त सोबत कुणी आवडीचे
पुढे जीव जडतो हिवाळ्यावरीही

पुरे ऊब देहास होते मिठीची
नको शाल दुलई नको आणि काही...

©जयश्री कुलकर्णी

वयात येता लयीत आली
छबी तिची मग वहीत आली

बरेच केले तिने बहाणे
लगेच कोठे दुलइत आली...

©जयदीप विघ्ने

दिवस पूर्वेला उगवला, पण मला दुलई सुटेना
थांबवाया गुंतणे हे... स्वप्न तू हलकेच आवर...

©जनार्दन केशव

उन्हाळा पावसाचा अन् हिवाळा ताप देणारा
ऋतू हल्ली तुझ्या-माझ्या स्वभावासारखे झाले...

© क्रांति साडेकर

राहुदे माझ्या उशाला रात माझी
चेतण्याची ही खरी सुरुवात माझी
.
सांग मी कुठल्या ऋतुचे नाव घेऊ
ना उन्हे, थंडी न ही बरसात माझी...

©कलीम खान.

अंतरी या घाव झाला काय सांगू
कारणी तू हे कुणाला काय सांगू
.
फाटकी रे गोधडी ही खूप थंडी
पाहुणा तू ये घराला काय सांगू...

©काश्मिरा पाटील.

माणून ना कुठेही , आहेत धर्म सारे
कसल्या परंपरेचे हे वाहतात वारे ?
.
रजईतल्या सुखाची घेतोस झोप तू अन् ;
काळोख पांघरोनी निजतात लाख तारे !....

©कविकुमार. मी कविकुमार

धुकाळ दुलई अलगद पांघरलेली शिखरे
स्वर्गासम भासे भुलवाई हवीहवीशी...

©कविता डवरे

दोघातच होती थंडी गोठवणारी
दोघातच होती शाल किती दिवसांनी

संपलेत माझे हाल किती दिवसांनी
तो भेटून गेला काल किती दिवसांनी...

©ममता सपकाळ

येतेच जिवावर दुराव्यातली थंडी
हे ऊन गुलाबी गोड जिवावर येते….

©ममता सपकाळ

आलीस पावसाची भिजवीत पावसाला
ग्लानीत भर दुपारी जाळीत पावसाला
.
थंडी गुलाब झाली; भिजला दवात वारा
चल ये मिटून घेऊ; दुलईत पावसाला....

©मनीषा साधू.

प्रत्येक वेळ नसतो हिरवा ऋतू हिवाळा
भोगायचाच असतो, वैशाख अन उन्हाळा..

©नितीन देशमुख.

आयुष्यभर मनाशी मी पोसला हिवाळा
माझ्या कलेवराला थोडे जपून जाळा...

©नितीन देशमुख.

गारव्याचे हे शहारे मी अता ठेऊ कुठे
शाल स्पर्शांची तुझ्या ना राहिली अंगावरी...

©निर्मिती कोलते

नसे तो हिवाळा नसे पावसाळा
ऋतू हा निराळा, मनाच्या तळाला...

©प्रवीण भोज.

काय पाहिजे आहे तिजला, काय शोधते
एक वेदना कधीपासुनी इथे हिंडते
.
ऊन असूदे, असेल थंडी, धो धो पाऊस
प्रत्येकाचे पाऊल तेव्हा तिकडे वळते...

©प्रमोद खराडे.

थंडी बिंडी काही नसते,
तुला बहाणा लागत असतो.
.
जरा लागतो मूड वगैरे,
अन तो पाणी मागत बसतो....

©पूजा फाटे.

तुझ्या आठवांचा असो हिवाळा
तुला अंथरावे तुला पांघरावे...

©पूजा फाटे.

हिवाळासुधा केवढा कुडकूडे मिठीला तुझ्या पांघरू की नको ??
या हिवाळी पेटवू आभाळ ये, लाव काडी, चांदण्या मी जाळतेे

© पूजा भडांगे लगदिवे

जरासे उरावे ... जरा मुक्त व्हावे
मला तू .. तुला मी .. पुन्हा पारखावे
.
उन्हाळा ... हिवाळा ... ऋतूंचे मरू दे
इथे पावसाळे खरे आगलावे….

©राधिका सूर्यवंशी फराटे

हिवाळा असो की असो पावसाळा
सदा भासतो तू उन्हाळ्याप्रमाणे ....

©Radhika Prem Sanskar

डोळे भरून केला , सत्कार आसवांनी
देऊ नको मला तू , कुठलीच शाल आता....

©रुपेश देशमुख.

रोज दैना आसवांची ढाल करते
दुःख वेडे वंचनाचे हाल करते
.
जिन्दगीने बेहिचक मज नाडले ,पण
पदर धरुनी सांत्वनाला शाल करते...

©रमेश सरकटे.

समेवर रात्र येताना , शहारे मोजते दुलई
गुलाबी स्पर्श पांघरले , तिने दोघातले काही...

©रमेश आराख

लागते थंडी छळू अन् वाटते की
देह आत्म्याची गरमशी शाल नाही...

© राजीव मासरूळकर

दाटला बघ अंतरी नुसता हिवाळा
सांग ना मग मी कुठे शोधू उबारा..

© रोहिणी मिठे- झगडे‎

हिवाळा, उन्हाळा पुन्हा पावसाळा
मनाचा ऋतू याहुनीही निराळा...

© सुप्रिया मिलिंद जाधव

काय तू करशील नंतर जर तुझ्या लक्षात आले
पाहुनी थंडी गुलाबी ओठ जर लाडात आले

दुःख हे नाही मुळी की मी तुझी नाही कुणीही
दुःख हे की फार हे उशिरा तुझ्या लक्षात आले

©स्वाती शुक्ल.

काय ती थंडी गुलाबी काय ते होते दिवस
मागच्या थंडीत ओठांना बरे होते दिवस....

©स्वाती शुक्ल.

जिवाचे हाल थंडीने
गुलाबी गाल थंडीने ..

©शिव डोईजोडे

तू लपेटुन घे मला उबदार शालीसारखा
कोवळ्या माझ्या जिवाला हा हिवाळा जाळतो

©संघमित्रा खंडारे

थंडी वाढली
मने सरदली
तने गोठली
हवास तू ....

© सुचरिता

ठावे आम्हाला तीन ऋतू उन्हाळा, पावसाळा, हिवाळा
चवथा ऋतू हृदयात जपावा यार हो, नाव त्याचे जिव्हाळा...

© शेख बिस्मिल्ला सोनोशी

ह्या ऋतुंना ठेव तू बाजूस आता गे जरासे
पावसाळा पांघरूया अन हिवाळा अंथरूया....

©सुधाकर इनामदार.

एक हिवाळा हुडहुडणारा थरथरणारे गाणे
हात घेऊनी हातामध्ये धुक्यात हरवून जाणे...

©वैभव देशमुख.

थंडी मिळेल नक्की आयुष्यभर गुलाबी
समजून घेत जाऊ माझा तुझा उन्हाळा..

.©विशाल राजगुरू

कपाटात दुलई समाधिस्त आहे
कदाचित गुलाबी असावा हिवाळा..

©वैशाली शेंबेकर मोडक

जिने बनवायची थंडी गुलाबी
तिने का ओढणी ल्यावी कळेना...

©वैभव वसंतराव कुलकर्णी

कधी हिवाळा कधी उन्हाळा घरात माझ्या
किती ऋतू आसऱ्यास येती उरात माझ्या...

© विजय देशमुख‎

जाहलो मी बघा...बावरा यारहो
साजणीचा असा...चेहरा यारहो
.
येतसे मंदिरी...रोजच्या पैठणी
शाल आईसही...पांघरा यारहो...

©विश्वजीत दीपक गुडधे.

तुझ्या गुलमोहराखाली उन्हाळे थांबले सारे
तुझ्या हळुवार स्पर्शाने, उन्हाला वाजली थंडी....

©विजय आव्हाड.

अंगभर आहेत व्रण त्या विस्तवाचे
आज देता ही कशाला शाल आहे ...

© विशाल मोहिते पाटील

पेटीमधली शाल मखमली आणि रेशमी तुझी आठवण
झुळूक आली गार हवेची पुन्हा बोचली तुझी आठवण..

©वीणा डोंगरवार

संकलक/संग्राहक : ©देवदत्त संगेप

Post a Comment

0 Comments