attitude marathi shayari | marathi attitude status | attitude status images |

 

संशयाचा लागतो वेताळ तेव्हा
मन भटकते दूर रानोमाळ तेव्हा...

© अल्पना देशमुख-नायक

जे जे भ्रमात गेले
वृद्धाश्रमात गेले

वेताळ तेच झाले
जे विक्रमात गेले...

©अमित वाघ

नम्रतेचा होउ दे माझ्यात विक्रम
होत आहे वल्गना वेताळ बाबा...

© अनिल विद्याधर आठलेकर

भूत व्यथेचे तिन्ही त्रिकाळी मजेत बसते मानगुटीवर
विरजण नाही पडत कधीही अमाप त्याच्या उत्साहावर ....

©डॉ.अमिता गोसावी

सुख सुख म्हणजे काय असते.?
संपलेल्या इच्छांचे भूत असते...

©भाव सुधा

नेहमी असते तुझ्या मानेवरी
काळजी वेताळ आहे का तुझी..

© बंडू सुमन अंधेरे

उजेड अंधाराची लहरी भुते किती !
तुझ्या नि माझ्या मधे पूल बोगदे किती...

© चंद्रशेखर सानेकर

जाते सरळ ती अडखळत नसते कधी
हडळ वेदनेची ठहरत नसते कधी....

©चंद्रकांत मोहोड

चेहरा जुलमी जगाचा वाचण्याला
मी कधी विक्रम कधी वेताळ झालो...

©चंद्रकांत कदम (सन्मित्र)

भवतालाचा काळ भयंकर
उरातला चांडाळ भयंकर

आपण सारे हतबल विक्रम
खांद्यावर वेताळ भयंकर...

© दास पाटील

पाहुनी प्रेतास माझ्या बोलला मृत्यू मला हे
भेट तर ठरलीच होती...आडवे आयुष्य आले...

©दत्तप्रसाद जोग

ती जरा हसली जरा आली जवळ
पाहिले जवळून ती होती हडळ...

© ज्ञानेश्वर शिवाजीराव कटारे

घे इथे उतरून वेताळा तुझा तू
चार खांदे मीच तर शोधीत आहे...

 ©धनंजय तांदळे

कशीबशी निर्जन जागी जगतात भुते..!
माणसास का इतकी घाबरतात भुते..?

खवीस , मुंज्या, हडळ किती जाती त्यांच्या
जातीसाठी पण कोठे लढतात भुते..?..

©गोविंद नाईक

सारखे होतात हल्ली भास जगण्याचे मला
सारखे प्रेतास भानावर कसे आणायचे .

© गोविंद नाईक

कुठे नाही परी वा चेटकिण दिसली
जशी गोष्टीमधे मी ऐकली होती...

©गणेश नागवडे

खुपे व्यस्तताही किती आठवांची
भुते नाचती ही दिवेलागणीला...

©हेमंत राजाराम

फुला,दागिन्यांची तिला हौस होती
तिचे प्रेत त्याने सजवले अखेरी...

©हेमलता पाटील

नव्या सावजाच्याच शोधात निघते
हडळ पण तरीही दिमाखात निघते...

©जयदीप विघ्ने

आता मिळेल नक्की माझ्या सुखास मुक्ती
मी प्रेत भावनांचे जाळून आज आले...

© सौ .ज्योत्स्ना राजपूत

माणसांच्या मेंदुवरचा वाढलेला ऊत काढा
देवतांनो माणसांची एकदा समजूत काढा
.
देव खातो का इथे काजू बदामा सांग मित्रा
फक्त या डोक्यात घुसलेले जरासे भूत काढा...

© जयप्रकाश सोनूरक

स्मशानी शोधली आणिक
भूते गावात आढळली...

©कमलाकर आत्माराम देसले

तेथे चितेवरी त्या गेली जळून प्रेते
राखेवरी नको त्या तू भाकरीस भाजू
.
हे जे जिवंत यांची नाही तमा तुलाही
प्रेतास व्यर्थ आता पाणी नकोस पाजू...

©खलील मोमीन

काय करू गझलेचे अंगी भूत बाधले
उगाच छळती रदिफ,काफिया,मतला आता..

©कालिदास चवडेकर

घाई करू नका रे प्रेतास जाळण्याची
मरणावरी स्वतःच्या रडलो कुठे पुरेसा..

© लक्ष्मण उगले

त्यांनी हळूच माझ्या प्रेतास प्रश्न केला
'मेलास तूच ह्याचा आहे कुठे पुरावा'..

©म.भा.चव्हाण

या जगाच्या सोसल्या नाहीत ज्याने लाख जखमा
तो सुखी नाहीच केवळ कागदी वेताळ आहे...

©मारोती मानेमोड

हे कर्ज वाटे शासनाचे मज असे,
बसला जणू पाठीवरी वेताळ हा...

©निर्मला सोनी

धर्मांध देश सारा, जातीस पाळतो तो
प्रेतास माणसाच्या, वणव्यात जाळतो तो...

©प्रवीण भोज

प्रेतास आज माझ्या जाळा लगेच तत्पर
श्वासात थांबलेल्या पेटून भूक जाते...

©वराडे पु ग पुरुषोत्तम 

शेती करून केला अपराध केवढा मी
देण्या कुणी मिळेना प्रेतास ह्याच खांदा...

©राजेश देवाळकर

एवढी भीती कशाची वाटते ह्या लेकरांना
भूत नाही, प्रेत नाही, माणसाचे चित्र आहे...

© श्रीकृष्ण राऊत

ती दुःखाच्या हत्तीलाही नाचवते
मुंगीच्याही अंगी येते भूत कधी...

©प्रा.डॉ.संतोष कुलकर्णी

मानवी रक्तात जेव्हा..गुण अघोरी पाहते
माणसाचे भूत व्हावे..फारवेळा वाटते...

© डॉ.स्नेहल कुलकर्णी

शेंदरी रंगातला पाषाण मी नाकारता
भोवतीचे लोक हे वेताळ झाले का बरे...

©कवीश्रीकुल

भुते असतात पानोपान लपलेली उपाशी
कुणाची डायरी चाळू नये चोरून कोणी...

© सदानंद बेंद्रे

वाहत्या प्रेतास पडला प्रश्न नंतर
कोणत्या काठावरी आलोत आपण..

©श्रीपाद अरुण जोशी

काढून बांगड्या तू हळुवार फेक माती
होईल प्रेत जागे चाहूल लागल्यावर..

© सतीश दराडे

प्रेतास लागली नाही आग का कळेना
होती अशी कुणाची ती द्रुष्ट लागलेली...

© संजय विटेकर

लिंबू मिरच्या धागे , घे भूत हडळ भागे
मांत्रीक लुटे तुमचे , घरदार प्रथेपायी...

©सुनिलनाना पानसरे

जीर्ण झालेल्या घराच्या काढल्या ज्यांनी विटा
शेवटी प्रेतास माझ्या त्यांनी कुठे झाकू दिले...

©शिव डोईजोडे

प्रश्न साधे सरळ केले मी तुला, पण
उत्तरांसाठी जणू वेताळ झालो...

©शंकर पाटील "श्रावण"

वाहत्या पाण्यात इथवर आणले
प्रेत माझे मी बरोबर आणले...

©स्वप्निल शेवडे

गाडलेले भूत इथली माणसे
श्वापदांचे स्तूप इथली माणसे..

©शरद देवराय.

उपाशी बाप झिजताना कुणीही सोबती नव्हते
लटकते प्रेत दिसल्यावर किती हे लोक हळहळले..

.©शिवाजी खाडे

राहिलो कोठे अताशा माणसे आपण
वाढलेल्या फक्त इच्छांची भुते आपण...

©श्रद्धा खानविलकर

भूत श्रद्धेचे नभाला पोचले
देव हा मातीमधे मुरला किती...

©डॉ.सुनील अहिरराव

असता शिते जमतात ती भुते
नात्याची झालीय नासधूस आता...

©सोपान डोके

सरणही हे वाटते प्रेतास माझ्या पिंजरा
देह आहे वाटतो आत्म्यास माझ्या पिंजरा..

©वसंत शिंदे V

देह इच्छा भाकरीची माळ होते
विक्रमी माझी व्यथा वेताळ होते...

©विशाल सावरकर

संकलक/संग्राहक : ©देवदत्त संगेप

Post a Comment

0 Comments